Friday, July 26, 2013

वारीतील सनातनी वाटमारे

पांडुरंगाच्या प्रती असलेल्या अपार उत्साहाची उधळण करत विविध रिंगणं, परिक्रमा आटोपून देशभरातल्या दिंड्या, पालख्या येत्या १९ तारखेला पंढरपुरात विसावतील. महिना-दीड महिन्याचा पायी प्रवास करणारी पावलं परतीच्या प्रवासाला लागतील. यावर्षी पंढरीच्या दिशेने जाणार्या पावलांमध्ये ३० टक्के वाढ होणार असल्याचा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, दिवसेंदिवस वाढत जाणार्या या गर्दीत ज्यांचा जयघोष केला जातो त्या संतांना समजून घेणारा टक्का किती असेल याबद्दल शंका आहे.
शंका असल्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक आहे, बोगस वारकरी. आता तुम्ही म्हणाल! बोगस वारकरी हा काय प्रकार आहे. हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर घडतोय. बहुजन देव, यात्रा, उत्सव यांना प्रथम नाकारायचे, बदनामी करायची तरीही
फरक पडला नाही तर ती व्यवस्थाच आपल्या ताब्यात घ्यायची हा जुना भटी कावा आहे. त्यानुसार सारं घडत असतं. पंढरीची वारीसुद्धा त्याला अपवाद नाही. काही दशकं आपण मागे जाऊन बघितलं तर लक्षात येईल की राजवाडे, भावे, जोशी, पांगारकर, भांडारकर हे सारे तथाकथित संशोधक विठ्ठलाला मेंढपाळाचा देव सिद्ध करण्यात आपली लेखणी झिजवत होते. पण बहुजन समाजाने त्यांचं सारं बोरू काम हाणून पाडलं आणि वेदाच्या कोणत्याही ऋचेत न बसणार्या आपल्या ओबडधोबड विठ्ठलाला स्वीकारलं. आपली योजना असफल होत असली की भट पवित्रा बदलतात तसं येथेही झालं. या लेखकांच्या नंतरच्या पिढ्यांनी विठ्ठलमहती गायला सुरुवात केली, तोवर काही शतकं उलटली होती. वारकरी संतांचं लोकप्रबोधन आणि आत्मशुद्धीचा प्रभाव एवढा वाढला की लोक एका अनामिक आकर्षणाने पंढरीत गोळा होऊ लागले.
जेथे गर्दीला पांगवणं शक्य नसतं तेथे गर्दीचा एक भाग होऊन गर्दीला आपल्या ताब्यात घ्यावं हा वैदिकांचा मंत्र वारीच्या कामात निमंत्रणसाठी वापरला गेला. आपली पोटार्थी माणसं किर्तनकार, बुवा, ह.भ.प. यांची झूल पांघरून वारीत सोडली गेली. कालांतराने हे पोटार्थी बुवा, किर्तनकार, वैदिकांनी रिमोटद्वारे असे चालवले, प्रोजेक्ट केले की भोळे वारकरी पुन्हा एकदा फसले. साखरे बुवा, बंडा तात्या ही त्याची उदारहणं आहेत.
सुख सागरी नेघे वस्ती, अंगी ज्ञानाची मस्ती
तुका म्हणे गाढव लेका, जेथे भेटेल तेथे ठोका.
वारी हा सार्या समाजासाठी संवेदनशील विषय असतो. तसा तो राज्यकर्त्यांसाठीही महत्त्वाचा असतो. गर्दी हा कोणत्याही राज्यकर्त्यांसाठी ‘वीक पाँईट‘ ठरतो. अशावेळी या गर्दीला निमंत्रित करून वेळ प्रसंगी बुद्धीभेदाचं शस्त्र वापरून काही गोष्टी केल्या जातात. लाखो वारकर्यात सोडलेल्या काही बोगस वारकर्यांच्या माध्यमातून वैदिकांनी आपले छुपे मनसुबे पूर्ण करायला सुरुवात केली आहे. मागच्यावर्षी ऐन पावसाळी अधिवेशनाच्या काळात ‘लाखो वारकर्यांचा अंधश्रद्घा निर्मूलन कायद्याला विरोध’ ही बातमी मी चॅनेलवर पाहिली आणि थक्कच झालो. कारण अंधश्रद्धा निर्मूलन हाच आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया आहे. कर्मकांड, अनिष्ठ रूढी, परंपरा, विषमता, भेदभाव, उच्च-नीच, चमत्कार यांच्या विरोधातला विचार आपल्या अभंगातून मांडला नाही असा एकही संत सापडणार नाही.
या कायद्याला खरोखर वारकर्यांचा विरोध आहे काय? यासाठी प्रत्यक्ष वारीत जाऊन मतं जाणून घ्यावी म्हणून मी दोन दिवस पंढरीत जाऊन आलो. दोन दिवसांत शंभराहून अधिक वारकर्यांशी बोललो, त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर संभ्रम दिसला. काहींना नवा कायदा येतोय याचीच माहिती नव्हती, ज्यांना माहिती होती त्यांचा गैरसमज करून दिला गेला होता, तर काही स्पष्टपणे बजावत होते की वारी बंद करणारा कायदा चुलीत घाला. या प्रस्तावित कायद्याच्या विरोधात पोपटावानी बोलणारे दोघे वारकरी भेटले. हा कायदा कसा हिंदुंच्या मुळावर आलाय वगैरे हे त्यांचं मत ऐकून मी अधिक चौकशी केल्यावर ते दोघंही वारकरी नव्हते, तर गेली दोन वर्षं या कायद्याच्या विरोधात वारकर्यांना पटवून देण्यासाठी आलेले सनातन संस्थेचे साधक होते.
टिळा, टोपी, माळा, अष्टगंध, पेहराव वारकर्यांचा पण अंतरंग सनातन असा हा मामला होता. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची ही सनातन संस्था, हिंदू राष्ट्र स्थापन व्हावं हा यांचा मूळ अजेंडा. सनातन प्रभात नावाचं दैनिक, साप्ताहिक हे चालवतात. दुर्जनांचा नाश करण्यासाठी यांची संस्था काम करते. दुर्जन कोण तर जे वेदाला, चातुर्वर्णाला मनुस्मृतीला मानत नाहीत ते दुर्जन. अशांचा नाश करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब यांना वर्ज्य नाही. परभणी, नांदेड, ठाणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटात काही सनातन साधकांची नावं यापूर्वीच आली आहेत. यावरून छुपा अजेंडा किती खतरनाक असू शकतो याचा अदमास घेता येतो.
सनातन संस्था आणि रा. स्व. संघ यांच्या ध्येय, कामात बरंच साम्य आढळतं. संघाप्रमाणे यांच्याही विविध संघटना इतर क्षेत्रात काम करतात. हिंदू जनजागरण समिती, देशभक्त पत्रकार संघ यासोबतच वारकर्यातही आता यांच्या संघटना काम करायला लागल्या आहेत. यांच्यापूर्वी हे काम संघाने विहिंपच्या नावाखाली करून ठेवलं आहे. रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर विहिंपने बुवा, किर्तन, प्रवचनकार यांना आपल्या ताब्यात घेऊन ठेवलं आहे. चिखलीचे प्रकाशबुवा जवंजाळ, दायमा महाराज, श्रीधरस्वामी ही त्याची उदाहरणं आहेत. दरवर्षी लाखोंनी वाढणारी वारी हे निमित्त सार्यांनी हेरून आपल्या इशार्यावर चालणारे बुवा, किर्तनकार या व्यवस्थांनी तयार करून ठेवले आहेत. यांचा मूळ वारकरी संप्रदाय, वारकरी संत यांच्याशी काही संबंध असल्याचं दिसत नाही.
गळा माळ भाळी बुका, परि जाणिला ना तुका।
गेला पेटूनी दंभाने, त्याचा जन्म जाई फुका ।।
अशी या सार्यांची अवस्था आहे. सनातन संघप्रणित बुवा, किर्तनकार यांच्या नादी लागणारा वारकरी नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम यांच्या वैचारिक संघर्षाशी अपरिचित आहे. वर्षानुवर्षं वारी करणार्यांना जिथे तुका कळला नाही तिथे या उपर्यांना तो काय कळेल?
अशा बोगस आणि वारकर्यांत प्लँट केलेल्या बुवा, महाराजांच्या माध्यमातून नव्या जादूटोणा विरोधी कायद्याला विरोध केला जातोच. पंढरीची वारी ही कुणाच्या नेतृत्वाखाली होत नाही. मुळात वारकरी हाच एक स्वतंत्र विचार प्रवाह असल्याने प्रत्येकजण स्वयं नेतृत्वावर पंढरीच्या दिशेने चालतो पण गर्दीचं माणसशास्त्र ज्यांना ठाऊक असतं अशांनी आता वाटमार्या करायला सुरुवात केली आहे. पंढरपुरात मुख्यमंत्री आल्यावर पाच-पंचवीस बोगस ह.भ.प एकत्र येऊन हा कायदा रद्द करण्याचा आग्रह धरून बसतात. सनातन, संघ, विहिंपवाले, पंडे, किर्तनकार हल्लागुल्ला करतात त्यावेळी मुख्यमंत्रीसुद्धा हबकून जातात. त्यांना वाटतं लाखो वारकर्यांचा या कायद्याला विरोध आहे पण वस्तुस्थिती तशी नाही.
संत तुकारामाचे वंशज डॉ. सदानंद मोरे, रामदास महाराज कैकाडी, शामसुंदर महाराज सोन्नर, अजय महाराज बावस्कर यांच्यासारखे लाखो शिष्य असणारे खरे वारकरी या नव्या कायद्याचं स्वागत करत आहेत. पण वारीतही नियोजनबद्ध खोट्याचा बोलबाला होत आहे हे वारकर्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. जादूटोणा विरोधी कायदा पारित झाला तर ज्या वैदिक, भटांच्या दुकानदार्या बंद होतील त्यांचाच विरोध सुरू आहे, पण चार-दोन सनातनांचा विरोध सरकार जुमानणार नाही म्हणून त्यांनी भोळ्या बहुजन वारकर्यांची ढाल करून एका क्रांतिकारी आणि संत कार्याला चार पावलं पुढे नेणार्या कायद्याला विरोध करणं सुरू केलं आहे.
नका दंतकथा येथे सांगो कोणी
कोरडे ते मानी बोल कोण।
या शब्दांत तुकाराम किर्तनकारांना खडसावतात. दंतकथा, चमत्कार सांगून समाजाला भ्रमित करू नका असं सांगणारे तुकाराम ज्यांना नको आहेत त्यांनीच या कायद्याला विरोध करून वारी आणि वारकर्यांना बदनाम करण्याचा धंदा सुरू केला आहे. हा कायदा झाल्यावर वारी, पूजा, सत्यनारायण, जत्रा, उत्सव बंद होतील असं सांगितलं तर कुणीही सामान्य माणूस त्याला विरोध करेल. पण मुळात नवा कायदा काय आहे? त्यातली बारा कलमं कोणती आहेत? हे किती लोकांना माहीत आहे. दरवर्षी करणी, जादूटोणा केल्याच्या संशयावरून आपल्या राज्यात दीडशे निरपराध लोक मारले जातात. याचा अर्थ एका दिवसाआड एकाची हत्या होते. भूत, भानामती, बाहेरची बाधा या नावावर मठ, दर्गा, मांत्रिकठाणे येथे शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार होतात. गुप्तधन काढण्यासाठी अल्पवयीन, कोवळ्या बालिकांचे खून होतात यात आज आपण सुपात आहोत तर इतर कुणीतरी जात्यात आहेत. पण आपण जात्यात येणारच नाही हे खात्रीपूर्वक
सांगता येत नाही. अशा भयावह गोष्टी आपल्या समाजात सुरूच राहिल्या पाहिजेत काय?
अंगी घेवुनिया वारे दया देती
तया भक्त हाती चोर आहे।
देव्हारा बैसोनी हालविती सुपे
ऐसे पापी पापें लिंपताती
या शब्दांत तुकारामांनी अंगात येणार्यांचा समाचार घेतला आहे. नवस, कर्मकांडं यावर कठोर प्रहार करणारे संत तुकाराम जर आज असते तर त्यांनी वारीत घुसलेल्या या पेंढार्यांना पैजारा मारून हा कायदा व्हावा यासाठी इंद्रायणी काठावर उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला असता. एवढा हा कायदा त्यांच्याशी वैचारिक नातं सांगणारा आहे. प्रत्यक्ष माणसाचा मृत्यू ओढवेल अशी कृत्यं करण्यावर निर्बंध आणणारा केवळ बारा कमलाचा हा कायदा आता राहिला आहे. या कायद्याच्या मसुद्यातील एकेका शब्दांशी मी परिचित आहे. हा कायदा वारकरी संप्रदायाचं कार्य चार पावलं पुढे नेणारा आहे हे आता तरी ध्यानी घ्यावं…
- पुरुषोत्तम आवरे-पाटील

No comments:

Post a Comment